लहानपणापासून समवयस्क लोकांपेक्षा चिल्यापिल्यांशी जास्त मैत्री जमायची. आता ही तीच परिस्थिती आहे म्हणा . अगदी एखादे काही दिवसांचे मूल रडू लागले तरी कन्या लगेच म्हणते, हिच्या हातात आले कि गप्प बसेल लगेच. ओळखीचे असो कि अनोळखी. सतत आपल्यापेक्षा लहान आकाराचा घोळका भोवती असल्याने आजोळी कोंबडी आणि तिच्या पिल्लांची उपमा दिली जायची. प्रस्तावनेस कारण कि पदवीच्या शेवटच्या वर्षी असंच एक ५-६ वर्षाच पिल्लू दोस्त मंडळीत सामील झालं. आणि बघता बघता सगळ्यात जवळचं दोस्त झालं.आकारमानाचा विचार करता तो त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा ही लहान. And miniatures are always cute ☺. तसाच हा ही अगदी गोड. थोडा जास्त ऍक्टिव्ह, सतत गतिमान, upto something type, पण तितकाच धीर गंभीर ही वाटायचा त्या वयात ही. कोणीही सहज प्रेमात पडावे असं रूप. मग काय जमली आपली दोस्ती. विद्यार्थी वर्गात मी सर्वात मोठी तर हा सर्वात छोटा. अगदी विजोड मैत्री. पण who cares? मी त्याला आणायला त्याच्या घरी जायचे सायकल वरून. बाळ होतं ते. त्यामुळे इतक्या पहाटे उठायचेही जीवावर यायचे त्याच्या आणि मी येणार नाही तू जा असेही कधी म्हंणणार नाही. झोपेतच "येणार आहे, येणार आहे " म्हणत राहायचा , त्यामुळे सोडून जाणेही अशक्य व्ह्याचे. मग काय? क्लास ला उशीर ठरलेला. हा लाडोबा असल्यामुळे याला कोणी बोलणार नाही, आणि मी मोठी असल्यामुळे मला उशिरा आल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागायचे. हा उठला नाही म्हणून उशीर झाला म्हंटले कि सरांचे डोळे विस्फारायचे. (काय पोरगी आहे ? इतक्या पहाटे, अंधारात, याला आणण्यासाठी इतक्या दूर उलट दिशेने जाते? असे कदाचित वाटत असावे ☺☺) परगावी गेल्यानंतर सुद्धा मी सर्वात वयस्क असल्याने याला सांभाळण्याची जबाबदारी माझी हे अलिखीतच होते, कारण मीही जरी विद्यार्थिनी असले तरी मुले सांभाळणे हे मुलींना जन्मजात जमते असाच जनमत असावा. मात्र पिलू फार समंजस होतं. त्रास कधी झालाच नाही त्याचा. उलट त्याला अतिशय त्रास होत असताना त्याने दाखवलेला समंजसपणा आणि त्याला होणाऱ्या वेदना पाहून डोळ्यात पाणी यायचं.
एक वर्षभराची दोस्ती आमची. त्यानंतर माझे लग्न झाले आणि सर्वांचा संपर्क जवळ जवळ तुटला. आणि मग...... एक दिवस...जवळ जवळ २० वर्षांनी मार्कच्या चेहरापुस्तकाच्या साहाय्याने तो एक दिवस अचानक दिसला. दिसला म्हणजे दुरून, आभासी. आणि चटकन प्रतिक्रिया आली माझी," hi! ओळखलंस मला?" अर्थातच शक्यता अजिबात वाटत नव्हती कारण तो खूप खूप लहान होता तेंव्हा आणि २० वर्षानंतर त्याला लहानपणीचे काही आठवणे जवळ जवळ अशक्यच. पण आश्चर्य म्हणजे त्याची चटकन प्रतिक्रिया आली, " ...... sir 's wife ? " " १०० percent "
पहिली प्रतिक्रिया जराशी चटका लावणारी होती. त्याला मी नव्हते आठवत, सरांची पत्नी आठवत होती . तरी त्याने ओळखले हेच कौतुक होते. मग आमचे संभाषण सुरु झाले. भेटलो नव्हतो आम्ही अजून. म्हणजे मीच टाळले होते. कारण २ वर्षात ताणतणावामुळे मी खूप आजारी दिसू लागले होते. आणि त्याला इतक्या वर्षानंतर त्याला भेटताना मला तेवढीच निरोगी आणि प्रसन्न म्हणून त्याला भेटायचे होते. पण जवळ जवळ बरेच महिने गेले आणि मग म्हंटले आता वाढत्या वयाबरोबर आपण असेच अशक्त दिसणार, आणखी टाळायला नको. आणि आम्ही भेटलो. मला वाटायचे कि जशी माझ्या भाच्या, पुतण्यांना मला इतक्या वर्षानंतर पाहण्याची फक्त उत्सुकता आहे. ती आता कुठे आहे? कशी आहे? हे जाणून घ्यायचंय तसेच यालाही एकदा भेटण्यापुरती उत्सुकता असेल.आणि एकदा भेट झाल्यानंतर, ती उत्सुकता शमल्यानंतर तोही अलिप्त होईल. पण त्याच्या डोळ्यात, वागण्यात, बोलण्यात मला सतत, आपुलकी प्रेम दिसलं, जे त्याच्या वयाच्या मुलांकडून काही अपवाद वगळता अपेक्षित नाहीये. तरीही मनाची तयारी काही होईना.आणि काही दिवसानंतर. का कोण जाणे अचानक एक गूढ वलय निर्माण झाले त्याच्या भोवती माझ्या दृष्टिकोनातून, जे भेदण्याची मला भीती वाटू लागली. एक अंतर ठेऊनच राहिले मी . तो मूडी वाटू लागला. कशाचा राग येईल याला, आणि कशावर चिडेल हा काही सांगता येत नाही असे सतत उगाचच वाटायचे. माझ्या नेहमीच्या थट्टेखोर स्वभावाचीही मला काळजी वाटायची.त्याने उत्तर दिले नाही कि चिंता वाटायची. प्रत्येक वेळा भेटल्यानंतर मी चुकते आहे, असा समज करून घेण्यात ,असं वाटायचं, पण मनात खूप खूप खेळ चालायचे.
. इतक्या वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले होते. आणि त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे मला माहित नव्हते, कारण तो जेंव्हा भेटला छान, प्रसन्न, प्रेमळ असाच भेटला. पण एक दिवस मला तो निराश वाटला. अंदाज करत राहिले मी कि याला या वयात काय त्रास असू शकेल? एक सुंदर निरोगी कुटुंब, छान मित्र परिवार, ज्ञानाचे तेज, इतकं असताना त्याच्यासारख्या तरुण मुलानं निराश व्हायला काही कारण असावं हे पटत नव्हतं. नुकतंच लग्न ही झालं त्याचं . आणि एक छानशी अर्धांगिनी मिळाली त्याला. त्याच्या तेजापुढे कदाचित थोडीशी विझल्यासारखी वाटली मला. पण हे फक्त मनाचे खेळ. १५ मिनिटाच्या भेटीत काय कळणार ना ? मग म्हंटलं त्याला त्याच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसलेले आवडो अथवा न आवडो, आपण त्याच्याशी बोलायचेच, जे आतापर्यंत मी टाळत आले होते,(कारण यांच्या पिढीच्या स्पेस वगैरेंच्या कल्पना जाणून होते ना ). त्याच्याशी बोलल्यानंतर कळले कि तो मूडी वगैरे काही नाहीये, पण त्याच्यात दुर्मिळ असा एक सद्गुण आहे, जो त्याला त्रासदायक ठरतोय. त्याच्याबद्दल आणखी प्रेम, आपुलकी वाटायला लागली, पण अंतर तरीही तसेच राहिले किंबहुना थोडेशे वाढलेच. कारण मला माझी मर्यादा लक्षात आली. याची बौद्धिक, मानसिक भूक मोठी आहे, आणि मी त्याबाबतीत अगदीच कफल्लक. याचा त्रास कमी करणे, याची बौद्धिक भूक भागवणे हे आपल्या आवाक्यातले नाहीये हे कळले. कारण मी अगदीच सामान्य. चार चौघींसारखी. आणि याला कदाचित खूप बुद्धिमान, परिपकव व्यक्तीपाशी आपले मन मोकळे करावेसे वाटत असेल. कुतूहल आहेच. पण फक्त वाट पाहू शकतो आपण. त्याला वाटले आणि त्यातून त्याला खरंच काही शांतता मिळणार असेल तर बोलेल तो कधीतरी. मग आपल्या कुवतीनुसार जे काही जमेल ते मार्ग शोधण्याचा निदान प्रयत्न तरी करू आपण.
सध्या तरी द्विधेत आहे. जास्त बोलू कि नको याच्याशी म्हणून.
कधी कधी माझी मलाच लाज हि वाटते कि हे पोर नेहमी स्वतः हुन बोलतं माझ्याशी. informally पण आणि मी फक्त कामाचेच बोलते. पण........ कदाचित कधीतरी माझ्या मनातील समज बदलेल. माझा दृष्टिकोन नेहमी बरोबर असतो असे नाही ना. कधी कधी फक्त आपल्या मनात काही समज गैरसमज असतात. जे बोलल्याने, व्यक्त झाल्याने, सहवासाने दूर होतात. आणि मी वेडी आहे. काहीही समजून घेते, किंवा काहीही कल्पना करते. ☺
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा