तिशी ओलांडलेली ती. सौन्दर्याच्या रूढ परिभाषेत न बसणारी. म्हणजे चाफेकळी नाक, रेखीव चेहरा, कमनीय बांधा, या व्याख्येत न बसणारी. पण तिच्यावर खिळणार नाही अशी नजर सापडायची नाही. मग ती वयाने लहान मुले असोत किंवा वय झालेली व्यक्ती.स्वतःला present कसे करावे याची पुरेपूर जाण व ज्ञान असणारी ती. डोळे मात्र अगदी चुंबकीय. आणि त्यांना कसे अधोरेखित करावे हे ही तिला कळते.चेहऱ्यातील उणीवा कशा झाकाव्या याबद्दल हि ती बरीच जागरूक . चेहऱ्यावरचे केस जरा जरी मागे केले तरी कावरी बावरी होणारी ती, प्रखर विरोध करणारी ती, हे चित्र हि कौतुस्कापदच. आपण कोणते रंग वापरले म्हणजे सदैव उठून दिसू, किंवा आपले फोटो चांगले येतील याबद्दल हि चांगलीच जागरूक. तिच्या दृष्टीने सौन्दर्य हे तिचे मुख्य ध्येय असावे असे पाहणाऱ्याला वाटावे. त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट घ्यायची तिची तयारी, पण एक कणभर त्यात उणीव पडू देणार नाही. अगदी सभे मध्ये ही ती प्रसाधन करू शकते बिनधास्त. आणि त्या कौतुकाच्या नजरा ... त्यांचे तर जणू व्यसन जडलेय तिला. तयार होऊन बाहेर पडल्यानंतर तिची ती भिरभिरणारी नजर सर्वत्र कौतुकाचा शोध घेत असते जणू. आपल्याला कोणी पाहत नाही तोपर्यंत रेंगाळणारी ती अशीही मला भासते. आणि जर कोण तिच्या मागे पुढे करत नसेल तर तो अहंकारी, गर्विष्ठ . मग ही त्याला काडीचीही किंमत देणार नाही, मग भले ही तो कितीही हुशार असो.
लाडीकपणे तक्रार करणारी ती, कि हा माझ्याशी फ्लर्ट करतो, तो माझ्याशी फ्लर्ट करतो. पण त्याने तसे करावे म्हणून कि काय त्याच व्यक्तींच्या मागे पुढे करणारी ती एखाद्या छोट्याशा बालिकेप्रमाणे भासते मला. स्त्रियांपेक्षा पुरुष मित्रांमध्ये जास्त आनंदी असणारी ती. कारण तिच्यामते एन्जॉय करणे, म्हणजे सिनेमा पाहणे, भटकणे आणि खाणे, आणि हे तिला मित्रांच्या संगतीत जास्त अनुभवता येते. आणि तसे पाहता हे नैसर्गिकच आहे. फक्त आपण ते स्वीकारत नाही, आपल्या वरच्या संस्कारांमुळे. स्त्री पुरुष यांच्यामध्ये निखळ मैत्री सुद्धा असू शकते जर आपण आपला दृष्टिकोन बदलला तर. तिच्या मनात जर काही पाप असते तर तिने हे उघड उघड सांगितले हि नसते . तिचा संसार उध्वस्त होण्याचे कारण हि तिलाच ठरवले काहीजणांनी. कारण तिचे असे मोकळे ढाकळे वागणे.तिच्या चारित्र्याबद्दल उलट सुलट बोलणारे लोक, असे कितीसे तिच्या सहवासात राहिलेत, काही दिवस किंवा काही तास फक्त. पण इतके खात्रीने बोलतात ना हे कोणाबद्दल पण कि जणू हेच प्रत्यक्षदर्शी आहेत त्या घटनांचे. पण तिने मला सांगितलेले कारण हि खरे असू शकतेच. चूक त्याची हि असेल कदाचित. फक्त कोणाचे तरी ऐकून मी खरे खोटे तर ठरवू शकत नाही. सत्य एक तिलाच माहिती. आणि ते जाणून घेण्याचे मला काहीच कारण नाही. ती माझ्याशी चांगली आहे, ती सच्ची आहे. ती आभास निर्माण करत नाही स्वतःबद्दल, हेच माझी तिच्याशी मैत्री होण्यासाठी पुरेसे आहे. ती आपल्या खाजगी आयुष्यात जे असेल जशी असेल, त्याच्याशी मला काहीही देणे घेणे असण्याची गरज मुळीच नाहीये.
बस ती जशी आहे, तशी माझी मैत्रीण आहे. लोकांच्या दृष्टीतून तिच्याकडे पाहून मला माझा दृष्टिकोन खराब करायचा नाहीये.
बस ती जशी आहे, तशी माझी मैत्रीण आहे. लोकांच्या दृष्टीतून तिच्याकडे पाहून मला माझा दृष्टिकोन खराब करायचा नाहीये.