रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

संस्कृती

दसऱ्याच्या निमित्ताने यावेळी धनगर वाड्यावर जाण्याचा योग आला . इतकी वर्षे इथे राहून ही  कळले नव्हते कि आजही या अवस्थेत माणसे राहतात . आणि इतकी आनंदात सहजपणे राहतात . आपण मात्र सर्व सुख सोयी असून सुद्धा नसलेल्या गोष्टींसाठी कुरकुरतो . जातानाच इतके हाल झाले कि परत इथे येण्याच्या कल्पनेनेही धडकी भरावी . रस्ता कसला ? खाच खळग्यानी भरलेला डोंगरच फ़क्त. अनेक वर्षे लोक जात येत असल्याने एक रेषा आखली गेली होती इतकेच . पोचल्यानंतर मात्र संस्कृती काय असते याचा पुरेपूर अनुभव आला . अनोळखी असलो तरी पाहुणे होतो, आणि अतिथी म्हणजे देव, ही  प्रत्यक्ष  भूमिका पहावयास मिळाली . आदरातिथ्याचा स्वीकार करून कार्यक्रम स्थळी पोचलो तर सकाळी ७ लाच सुरु झालेला कार्यक्रम आता रंगू लागलेला .  देव सभा भरलेली . देव म्हणजे कोण तर त्यांच्यातीलच ५ किंवा ७ जण असावेत . समाजाच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या जात होत्या, त्यावर उपाय सांगितले जात होते. अर्थातच इथे फोटो काढण्यास मनाई होती . पण एकी आणि सामोपचाराने समाजाच्या समस्या सोडवणे किती सोपे आहे हे तरी कलले. अर्थात मीच शहाणा ही वृत्ती सोडली तर. आधुनिकतेच्या बुरख्याखाली आपल्या परंपरा , आपले पोशाख, याला तिलांजली देणारी आपली प्रगत मुले पाहिली  कि बाहेरच्या समाजात तितक्याच आधुनिकतेने वावरणारी हि मुले या उत्सवाच्या वेळी पारंपारिक झगाच आवर्जून घालून सम्मिलित  होताना पाहून तितकेच कौतुक वाटते. १५० वर्षापूर्वीचे आपले पायातील तोडे, तो झगा, विशिष्ट पद्धतीचा फेटा, या सर्वांविषयी कौतुक व अभिमानाने सांगणारी हि पिढी पाहून कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही 

एरवी आधुनिक पोशाखात वावरणारी हि मुले उत्सावादिवशी बिनधास्त पारंपारिक वेश धारण करतात . अगदी झगा, फेटा आणि चाळ सुद्धा . 

आणि हे जुन्या पिढी पुरते मर्यादित नाहीये यात ४ पिढ्या सामील आहेत. 
पहिली पिढी 
दुसरी पिढी 
तिसरी पिढी 
आणि आता चौथी पिढी सुद्धा 
परंपराच नाही तर माणुसकी सुद्धा तितक्याच तळमळीने जपली जाते अशा छोट्या वाड्या  वस्त्यांवर . जेम तेम  १० घरे दिसली तिथे. त्यातील हि बरीचशी पोरे नोकरीनिमित्ताने शहरात राहणारी आणि फक्त उत्सव काळात जमणारी . इतक्या माणसाना सामावणारी सपाट जागा ही नव्हती तिथे, पण कुठे चिडचिड नाही, कुठे गोंधळ नाही . फक्त समजूतदारपणा, आपुलकी   आणि प्रेम . 
आधुनिकतेबरोबरच वारसाही जपणारी . 
देवांची स्थापना घोंगडी वरच झाली पाहिजे आणि दुड्ग्यातच ताकाचा नैवेद्य दाखवला पहिजे. 

आणि मग देवघरातच माच्व्यासारखे काहीतरी . विचारलेच मी (खोडच ती,मेल्याशिवाय जाईल कशी )," हे कशासाठी ?". तर घरची कारभारीण उत्तरली," घोंगडे वळत घालाय नको का? दुसऱ्यादिवशी पुन्हा तेच वापरायचे असते"
म्हणजे हि पावसाळ्यातील जोडणी . आणि आपण रेनकोट असून हि किती कुरकुरतो?
त्याखालीच प्रसादासाठी वेगळी चूल . दूध घालून शिजवलेला भात प्रसाद म्हणून . 
आणि एक चांगले दृश्य म्हणजे या दुर्गम भागात येण्यास कोणी प्राथमिक शिक्षक तयार नसतात, पण आता याच वाड्यावरील व्यक्ती तिथेच शिक्षक म्हणून काम करीत अहेत. अर्थातच त्यांच्या भाषेत, संवाद साधला जाईल आणि त्यांच्यातीलच असल्यामुळे मनापासून झटेल ती व्यक्ती त्यांच्या विकासासाठी  आणि परिणाम दिसत पण आहेत. 

आपले ज्ञान झाकून ठेवणारी हुशार माणसे कुठे आणि भरभरून स्वतःबद्दल माहिती देणारी हि भटकी जमात कुठे . आणखी काही  नाही शिकता आले यादिवशी मला तरी इतका अवघड  रस्ता चढून गेल्यावर निदान एक सकारात्मक दृष्टीकोन तरी शिकता आल. अनंत अडचणी आल्यातरी त्याला प्राक्तन समझून हसत सामोरे जाण्याचा . :) :)

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५

श्री गणेशा

आज लिहायला सुरु करावेसे वाटले. 
कारण…. 
आलेले अनुभव experiences, खूप काही शिकवून जातात कधी कधी 
आपल्या मनाविरुद्ध ही काही वेळा . 
आजवर फक्त वहीत किंवा फेसबुक वर लिहित होते . पण मग विविध प्रतिक्रिया वाचून वाटू लागले कि खोट्या प्रतिक्रिया , नसती मानापमानाची संकल्पना, यापेक्षा फक्त आपल्या जवळच्या लोकांसमोर व्यक्त व्हावे  आणि आपला दृष्टीकोन , आपली दृष्टी तपासून घ्यावी . माणूस म्हणून आपण नेहमीच घडत राहू, पण योग्य सहवास, योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात असतील तर. म्हणून हा सर्व लेखनप्रपंच . स्वतःची क्षितिजे विस्तार्ण्यासाठी, स्वतःचे मन मोकळे करण्यासाठी